Thane News : शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी झाडल्या 3 गोळ्या

ठाणे : भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रिव्हॉल्व्हरमधून दीपक म्हात्रे यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. सुदैवाने म्हात्रे यांनी गोळ्या चुकविल्याने त्यांना एकही गोळी लागली नाही. ते थोडक्यात बचावले. हा प्रकार शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दीपक म्हात्रे हे वैयक्तिक कामासाठी पत्नीसह ठाणे येथे गेले होते. ठाण्याहून ते रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी घरी परतले. घरासमोरील परिसरात त्यांनी आपली गाडी पार्क केली. त्यानंतर त्याच्या पत्नी इमारतीच्या समोर लावलेल्या दुचाकीची कडे पहात होत्या. त्यांच्या मागोमाग दीपकही आले व ते दुचाकीची पहाणी करत असताना दुसर्‍या दुचाकीवरुन आलेल्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पण अंतर लांब असल्याने त्याचा नेम चुकला. दीपक म्हात्रे हे खाली वाकल्याने गोळी चुकली. ते त्याच्यामागे धावत गेले. तेव्हा त्यांनी पुन्हा दुसर्‍यांना गोळीबार केला. तेव्हा दीपक यांनी दुसर्‍या बाजूला धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी तिसर्‍यांदा गोळीबार केला. सुदैवाने या गोळीचा नेम चुकला. तेव्हा दीपक म्हात्रे व त्यांची पत्नी इमारतीत आश्रयासाठी गेल्या. या घटनेनंतर नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची तपासणी केली. ग्रामपंचायत निवडणुकीतील वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे.