बिहारमध्ये भाजप महिला माेर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीची हत्या

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमधील मतमोजणीच्या (bihar-election) काही तास आधीच (before-counting) भाजप महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीवर (husband-of-bjp-leader-shot-dead) अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोजपूर जिल्ह्यातील टाऊन पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या सुंदरनगर परिसरात सोमवारी (दि. 9) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

प्रीतम नारायण सिंह असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रीतम यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांना सुंदरनगर परिसरातील मंदिराजवळ दोन बाईकस्वारांनी अडवून त्यांची चौकशी करू लागले. त्यावेळी अचानक हल्लेखोरांनी प्रीतम यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, तिथे त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने दुसरीकडे हलवण्याची तयारी केली होती. मात्र, वाटेतच त्यांच्या मृत्यू झाला. प्रीतम यांना दोन गोळ्या लागल्या असून, त्यापैकी एक डोक्यात तर दुसरी गोळी पाठीत लागली आहे. प्रीतम आणि त्यांच्या भावाचा गेल्या एका वर्षापासून जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू असल्याची माहिती प्रीतम यांचा मुलगा प्रियदर्शी याने दिली.

प्रीतम यांच्या पत्नी शहरातील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्या स्थानिक राजकारणामध्ये तसेच विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्या फारच सक्रिय होत्या. अगदी प्रचारापासून ते सभांपर्यंत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या काम करत होत्या.
घटनेची माहिती मिळताच भोजपूरचे पोलीस अधीक्षक किशोर राय, एसडीओपी पंकज कुमार रावत यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास सुरू असून या प्रकरणामधील दोषींना आम्ही लवकरच ताब्यात घेऊ, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये सध्या तपासासाठी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.