सीआरपीएफ आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

भोपाल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) असलेल्या प्रवीण कक्कर यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अश्विन शर्मा यांच्या घरावर आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर बिल्डींगच्या बाहेर असलेल्या सीआरपीएफचे जवान आणि मध्य प्रदेश पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस कामात अडथळा निर्माण करीत असल्याचे सीआरपीएफ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

याबाबत माहिती देताना भोपाळचे पोलीस एसपी भूपिंदर सिंग यांनी सांगितले की, ‘आम्हाला आयकर विभागाच्या कारवाईशी काही एक देणंघेणं नसून आयकर विभागातर्फे धाड टाकण्यात आलेली इमारत ही अपार्टमेंट असल्याने तिथं अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. या इमारतीतील लोक या कारवाईमुळे भयभीत झाले असून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याने आम्ही येथे दाखल झालो आहोत.’

तर सीआरपीएफ चे अधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितले की, ‘मध्य प्रदेश पोलीस आम्हाला आमचे काम करु देत नाही.तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. आम्ही फक्त आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत आहोत. बिल्डींगमध्ये कारवाई सुरु असल्याने पोलिसांना आम्ही आत जाऊ दिले नाही. आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावत आहोत.’