लग्नानंतर सत्यनारायणाच्या पुजेसाठी आलेल्या गुरूजींनी आशिर्वादासह दिला ‘कोरोना’, नवरदेवाचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’

भोपाळ : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाचं थैमान सुरुच असताना लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करून विवाह करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याला एक छोटी चूक खूपच महागात पडली. लग्नानंतर घरात कथा वाचन करण्यासाठी आणि पूजा ठेवण्यासाठी नवविवाहितांना चांगलच भोवलं आहे. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली.

गोविंदपुरा परिसरात नुकताच लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर परंपरेनुसार नवरदेवाच्या घरी कथा वाचन आणि पूजा होती. या पूजेला आलेले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं त्यांचा संसर्ग नवरदेव आणि त्याच्या भावाला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्व गाइडलाइनचं पालन करत विवाहसोहळा संपन्न झाला त्यानंतर घरी पूजा, कथा वाचन आणि आरती झाली. नवविवाहित दाम्पत्यानं गुरुजींचे आशिर्वाद घेतले आणि या आशिर्वादासोबतच गुरुजींनी कोरोनाही दिला. दुसऱ्या दिवशी घरी आलेले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती नवरदेवाच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर पूजेसाठी उपस्थित असणाऱ्या 12 लोकांची चाचणी करण्यात आली. यामध्ये नवरदेव आणि त्याचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर इतर सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नवरदेवाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर वधूला तिच्या माहेरी पाठवण्याची व्यवस्था कुटुंबीयांनी केली. भोपाळमध्ये 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भोपाळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुजी आले आणि आशिर्वादासोबत कोरोना देऊन गेल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.