धक्कादायक ! कोविड प्रोटोकॉलनुसार 187 जणांवर अंत्यसंस्कार पण रेकॉर्डवर फक्त 5

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी सरकारकडून विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याला कोविड प्रोटोकॉलही म्हटले जाते. याच प्रोटोकॉलनुसार, 187 जणांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, रेकॉर्डवर फक्त 5 जणांचाच मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. ही घटना मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे घडली.

भोपाळ येथील स्मशानभूमीत दररोज 5 ते 10 मृतदेह येत होते. तर आता हा आकडा 35-40 वर गेला आहे. तसेच कोविड प्रोटोकॉलनुसार, अग्नी दिलेल्या मृतदेहांची संख्या कोरोनाने मृत्यू झालेल्या सरकारी आकड्यांपेक्षा जास्त आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी या दोन्ही स्मशानभूमीत एकूण 187 मृतदेहांवर कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, सरकारी आकड्यात या चार दिवसांत कोरोनामुळे फक्त 5 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

सरकारी आकडे आणि स्मशानभूमीत अग्नी दिलेल्या मृतदेहांच्या आकड्यावरून काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर शिवराज सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले, की मृतांच्या अंतरामुळे हे कोरोनाबाधित रुग्ण आणि संशयित कोरोनाबाधित रुग्णांचे अंत्यसंस्कार एकाच प्रोटोकॉलनुसार केले जात आहेत. दरम्यान, कोरोना महामारी इतकी भयानक बनली आहे, की रुग्णालयात उपचार घेण्यासाठी बेड्स मिळत नाहीच परंतु अंत्यसंस्कारासाठीही प्रतिक्षा करावी लागत आहे.