जोतिरादित्यांनी पक्ष बदलल्यानंतर कमलनाथ सरकारने ‘फास’ आवळला, जमीन खरेदी प्रकरणात होऊ शकते FIR

भोपाळ : वृत्त संस्था – ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडताच त्यांना चारही बाजूने घेरण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध तपास सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण जमीन खरेदीचे आहे, ज्यामध्ये 10 हजार करोड रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एफआयआर सुद्धा होऊ शकते. यादरम्यान, ग्वाल्हेरचे एसपी देवेंद्र सिंह राजपूत यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी अमित सिंह एसपी झाले आहेत.

मध्य प्रदेशात सुरू असलेल्या राजकीय घटनाक्रमात काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजे ईओडब्लूने एका जुन्या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे. ग्वाल्हेरचे वकील सुरेंद्र श्रीवास्तव यांनी एक अर्ज देऊन कारवाईची मागणी केली आहे. याच तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

अशी आहे तक्रार

26 मार्च 2014 ला आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एक तक्रार अर्ज देण्यात आला होता. यामध्ये आरोप होते की, ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या कुटुंबियांनी 2009 मध्ये महलगाव, ग्वाल्हेरची जमीन (सर्व्हे क्रमांक 916) खरेदी करून रजिस्ट्रेशनमध्ये काटछाट करून अर्जदाराची जमीन 6000 स्क्वेयर फूटाने कमी केली होती. सोबतच सिंधिया देवस्थानचे चेअरमन आणि ट्रस्टींनी महलगाव, जिल्हा ग्वाल्हेर येथील शासकीय भूमी सर्व्हे क्रमांक 1217 विकण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने बनावट कागदपत्र तयार केली. या संबंधी एक तक्रार अर्ज 23 ऑगस्ट 2014 ला आर्थिक गुन्हे शाखेमध्ये देण्यात आला होता. दोन्ही तक्रारी तपासानंतर बंद करण्यात आल्या होत्या. यावर श्रीवास्तव यांनी पुन्हा अर्ज केला होता.

आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केला तपास
सुरेंद्र श्रीवास्तव यांच्या अर्जावर आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई केली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यादरम्यान मध्य प्रदेश शासनाने ग्वाल्हेरचे आर्थिक गुन्हे शाखा एसपींची बदली केली आहे. कमलनाथ सरकारने आर्थिक गुन्हे शाखेचे सध्याचे एसपी देवेंद्र सिंह राजपूत यांन हटवून त्यांच्या ठिकाणी अमित सिंह यांना नवे एसपी बनवले आहे. एसपींच्या बदलीमुळे सिंधियांच्या अडचणी वाढू शकतात.