MP : कोरोना काळात ‘शिवराज’ सरकारने वाटला 30 कोटींचा काढा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या युद्धादरम्यान मास्क, सॅनिटायझर सोबतच रोग प्रतिकारण शक्ती मजबूत करण्यासाठी काढ्यावर सर्वाधिक भर देण्यात आला. मात्र यावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. वास्तविक, या साथीच्या आजारात मध्य प्रदेश सरकारने राज्यातील जनतेची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा वाटण्यास सुरुवात केली. विधानसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सरकारने याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हंटले की, कोरोना काळात जवळपास ३० कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या काढ्याचे लोकांमध्ये वाटप करण्यात आले. दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेसने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला घेराव घातला आहे. त्याचवेळी भाजपने म्हंटले कि, लोकांच्या आरोग्यावर केलेल्या खर्चाला काँग्रेस चुकीचे कसे ठरवू शकते.

कॉंग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष आणि कमलनाथ यांच्या नेतृत्वात असणाऱ्या सरकारमधील मंत्री जीतू पटवारी यांनी विधानसभेत प्रश्न विचारला कि, नोव्हेंबर २०२० पर्यंत मध्य प्रदेश सरकारने काढा बनवण्यासाठी व वितरण करण्यासाठी किती खर्च केला? तसेच नोव्हेंबर २०२० पर्यंत राज्यात काढ्याचे किती पॅकेट प्रदेशात वाटण्यात आले आणि त्यात किती काढा होता, असा सवालही पटवारी यांनी केला. कॉंग्रेस आमदार पटवारी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आयुष राज्यमंत्री रामकिशोर कावरे यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२० पर्यंत मध्य प्रदेश सरकारने ३० कोटी ६४ लाख ४८ हजार ३०८ रुपयांचा काढा वितरित केला आहे. यावेळी ५० ग्रॅम काढ्याचे जवळपास ६ कोटी ३ लाख ९४ हजार पाकिटे वाटली गेली आहेत.

यासंदर्भात कॉंग्रेसचे आमदार जीतू पटवारी यांनी एका मुलाखतीत प्रश्न उपस्थित केले. पटवारी म्हणाले की, मध्य प्रदेशची लोकसंख्या साडे सात कोटी आहे आणि सरकार म्हणतेय की त्यांनी ६ कोटी लोकांना काढा वाटला. हे कसे शक्य आहे? त्यात काढा तयार करण्यासाठी व वितरणासाठी ३० कोटी रुपये खर्च झाले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. त्याचवेळी कॉंग्रेसचे आमदार जीतू पटवारी यांनी केलेले आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) फेटाळून लावले आहेत.

यावर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी उलट कॉंग्रेसवरच प्रश्न उपस्थित केले. नरोत्तम मिश्रा म्हणाले की, केवळ कॉंग्रेससारखा पक्षच लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करू शकतो. खरं तर, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या सरकारने 30 कोटी काय 300 कोटी रुपये देखील खर्च केले असते. ते म्हणाले की, जर मध्य प्रदेशात मृत्यूचे प्रमाण कमी राहिले तर त्याचे मोठे कारण आमच्या सरकारने वितरित केलेला काढा आहे.