धक्कादायक ! वीज कोसळून तरूणाचा मृत्यू झाल्याचा रचला होता बनाव, 4 महिन्यांनी पोलिसांना लावला छडा

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाईन –   वीज कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याचा रचलेला बनाव तब्बल चार महिन्यांनी भोपाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू नव्हे, तर वीजेचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या प्रेयसीच्या बापाने त्याची हत्या केली होती. या प्रकरणी प्रेयसीच्या बापाला अटक केली आहे.

रईस खान असे अटक केलेल्याचे नाव आहे. भोपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र असे मृत तरुणाचे नाव आहे. धर्मेंद्रसोबत रईस खान याच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्याला खानचा विरोध होता. 29 ऑगस्ट रोजी धर्मेंद्र त्याच्या मुलीला भेटून दुचाकीवरून परतत होता. त्यावेळी खान याने त्याच्या डोक्यात दगड घातला त्यानंतर त्याला उच्चदाबाच्या वीजवाहिनीने शॉक दिला. त्याच्या मृत्यूनंतर मृतदेह रस्त्यालगत दुचाकीजवळ आणून फेकला. वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला गेला होता. शवविच्छेदन अहवालातूनही धर्मेंद्रचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर देखील पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. तपासणीदरम्यान धर्मेंद्र याच्या हाताची मूठ बंद होती. दुचाकी चालवताना मूठ बंद राहणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याचवेळी गुंगा परिसरात राहणाऱ्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रईस खान याला ताब्यात घेतले. त्याने धर्मेंद्रच्या हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक केली आहे.