कुटूंबाला धडा शिकवण्यासाठी ‘होमिओपॅथी’ डॉक्टरनं पाठवलं होतं खा. साध्वी प्रज्ञा यांना ‘धमकी’चं पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील होमिओपॅथी डॉक्टर सय्यद अब्दुल रहमान ला मध्यप्रदेश पोलिसांच्या एटीएस ने खासदार प्रज्ञा ठाकूरला संशयित स्फोटकांसह धमकीचे पत्र पाठविल्याबद्दल अटक केली आहे. अब्दुल रहमान यांनी आपल्या कुटूंबाला धडा शिकवण्यासाठी एका काल्पनिक दहशतवादी संघटनेच्या नावे धमकीचे पत्र पाठवले होते. पत्रात कुटुंबीयांची आणि ओळखीची नावे लिहिलेली होती, ज्यामुळे पोलीस त्यांना पकडू शकतील आणि जेलमध्ये टाकतील. एटीएसने आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांच्या पोलिस रिमांडवर घेतले आहे.

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला भोपाळ पोलीस करत होते, नंतर हे प्रकरण एटीएस कडे सोपवण्यात आले. एडीजी एटीएस राजेश गुप्ता म्हणाले की, धमकीच्या पत्रामध्ये सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे तपास सुरू केला परंतु त्यात कुठल्याही जागेचे नाव नसल्याने आरोपीला ओळखणे खूप कठीण गेले. चार दिवसात एटीएसने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात अब्दुल रहमान या आरोपीस ओळखले आणि त्याच्या कारवायांवर नजर ठेऊन त्याला अटक केली.

एटीएस चौकशीत अब्दुल रहमान याने सांगितले की त्याच्यावर २०१४ मध्ये कुटुंबातील सदस्यांनीच हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल केला होता, ज्यामुळे त्याला १८ महिने तुरूंगात रहावे लागले होते. याचा बदला घेण्यासाठी त्याने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्या पण कोणीही त्याच्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही. यानंतर अब्दुल रहमान याने दहशतवादी संघटनेच्या नावाखाली मोठ्या हिंदू नेत्यांना पत्राने धमकावले आणि त्यात त्याच्या नातेवाईकांची नावे लिहिण्याचा कट रचला.

ऑक्टोबरमध्ये आरोपीने अगरबत्ती पॅकेटच्या पॉलिथीनमध्ये संशयित स्फोट पावडर भरली आणि कुटुंबीयांच्या काही कागदपत्रांसह धमकी देणारे पत्र प्रज्ञा ठाकूर यांना पोस्टद्वारे पाठविली. खासदार ठाकूर यांनी जानेवारीत या पत्रास उघडले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. कमला नगर पोलिस ठाण्यात कलम ३२६ (ख) आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फेसबुक पेज लाईक करा –