‘या’ २ हायप्रोफाइल उमेदवारांच्या प्रचाराला पक्षाध्यक्ष ‘नमो’ आणि ‘रागा’ यांची दांडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान पार पडत आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळमधून काँग्रेसकडून दिग्विजय सिंग तर भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंग निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात देखील उद्या मतदान होत आहे. दोन्हीही उमेदवार वेगवेगळ्या विचारसरणीचे मात्र, दोघांच्या बाबतीत एक विचित्र योगायोग घडला आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला पक्षातील प्रमुख नेते म्‍हणजे भाजपकडून नरेंद्र मोदी व काँग्रेसचे राहुल गांधी फिरकलेच नाहीत.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी जामिनावर असणारी साध्वी प्रज्ञा यांच्या प्रचाराला महत्वाचे नेते म्हणजे पंतप्रधान मोदीच न आल्याने आता त्यांच्या मतांवर काही परिणाम होतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी देखील दिग्‍विजय सिंह यांच्‍या लोकसभा निवडणुकांच्‍या प्रचारासाठी पाठ फिरवल्‍याचे चित्र स्‍पष्‍ट दिसून आले. पहिल्‍यांदा निवडणूक जागेवरुन मध्‍ये प्रदेशचे मुख्‍यमंत्री कमलनाथ आणि दिग्‍विजय सिंह यांच्‍यात मतभेद होते. जर निवडणूक लढवायचीच असेल तर सर्वात अवघड मतदारसंघातून लढवा, असे कमलनाथ यांनी दिग्विजय यांना सांगितले होते. त्यानंतर दिग्विजय यांनी भोपाळमधून लढण्याचा निर्णय घेतला. भोपाळ मध्ये काँग्रेसने ३० वर्ष निवडणूक जिंकलेली नाही.

दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये लोकसभेच्या २९ जागा आहेत. सध्या काँग्रेसचे फक्त २ खासदार आहेत. पक्ष सांगेल त्या जागेवरून निवडणूक लढण्यास तयार असल्याचं दिग्विजय यांनी म्हटले होते, त्याप्रमाणे त्यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली.