Bhosari News : मुलाच्या आर्थिक वादातून 75 वर्षाच्या आजोबांनी केले नातवावर सपासप वार

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मुलासोबत असलेल्या आर्थिक वादाच्या रागातून आजोबांनी 17 वर्षाच्या नातवावर चाकूनं सपासप वार केल्याची धक्कादायक घटना भोसरी येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.28) पहाटे मोशी येथील गंधर्व नगरी फेज-2 येथे घडली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 75 वर्षीय आजोबांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर महादेव सनगर (वय-75 रा. गंधर्व नगरी फेज-2, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आजोबांचे नाव आहे. याप्रकरणी आशुतोष संतोष सनगर (वय-17 रा. गंधर्व नगरी फेज-2, मोशी) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर सनगर आणि संतोष सनगर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारांचे वाद आहेत. याच रागातून शंकर यांनी नातू आशुतोष याच्यावर चाकूनं वार केले.

शंकर सनगर यांनी सोमवारी मध्यरात्री अडीच ते तीन दरम्यान आशुतोष झोपलेल्या खोलीत गेले. त्यांनी सोबत आणलेल्या धारदार चाकूनं आशुतोष याच्यावर हल्ला करत वार केले. या घटनेत आशुतोष याच्या डाव्या छातीवर, उजव्या खांद्यावर, पाठिवर, उजव्या कानावर चाकूने सपासप वार केले. तसेच डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपी शंकर सनगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुजारी करत आहेत.