भोसरीत गोळीबार करून लुटणारा सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी, एमआयडीसी परिसरातील सराईत गुन्हेगार असणाऱ्याने भर दिवसा गवळी माथा येथे गोळीबार करुन लुटल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुसक्या आवळल्या आहेत. ज्ञानेश्वर रामदास लांडगे (रा. गणेश नगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे, मल्लेश कोळवी आणि गणेश धोत्रे हे तिघेजण प्रशांत लांडगे यांच्या घरी गेले होते. त्यांना घरातून बाहेर ओढत पार्किंगमध्ये आणून त्यांना मारहाण केली. त्यावेळी प्रशांत लांडगे यांनी आरडा ओरडा केल्याने त्यांचे मित्र त्या ठिकाणी आले. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वर लांडगे याने तेथून पळून जाताना प्रशांत लांडगे याच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. तसेच जाताना हवेत गोळीबार करून आणि घरासमोरील सामानाची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला पकडण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन पथके रवाना करण्यात आली. पथकांनी आरोपींचा खडी मशीन रोड, कचरा डेपो परिसरात शोध घेऊन अटक केली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासात सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे याला बेड्या ठोकल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ  – 1 चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक गुन्हे सतीश नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समाधान पांचाळ, रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार गवारे, पोलीस नाईक दिपक महाजन, विजय पारधी, पोलीस शिपाई स्वप्नील लांडगे, विशाल माने, विजय दौंडकर, आणि विशाल काळे.