निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ IAS अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली. मात्र, ही झाडाझडती घेणे कर्नाटक कॅडरचे आयएएस अधिकारी मोहम्मद मोहिसन यांना चांगलेच भोवले आहे. निवडणुक आयोगाने त्यांना निलंबित केले आहे.

संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची १६ एप्रिलला झडती घेतली होती. निवडणुक आयोगाच्या निर्देशनांचे पालन न करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांच्या अहवालाच्या आधारावर आयोगाने संबलपूरच्या जनरल पर्यवेक्षकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून एक मोठी काळी पेटी खासगी गाडीत नेऊन ठेवली होती. या पेटीत काय होते. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरमधून आणलेली अशी काळी पेटी खासगी गाडीत ठेवता येते का, काय होते या पेटीत याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने जाहीरपणे निवडणुक आयोगाकडे केली होती. तशी तक्रारही करण्यात आली होती. मात्र, त्यावर निवडणुक आयोगाने काय निर्णय घेतला. चौकशी केली का याची काहीही माहिती पुढे आली नाही.

या पार्श्वभूमीवर मोहम्मद मोहिसन यांनी खबरदारी म्हणून मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबलपूरमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅलिकॉप्टरची चौकशी करणे हे निवडणुक आयोगाच्या अखत्यारीत येत नाही. एप्रिल २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या निर्देशानुसार, एसपीजी सुरक्षा प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना अशा झाडाझडतीतून सुट प्राप्त होते.

निवडणुक आयोगाने उपनिवडणुक आयुक्त धमेंद्र शर्मा यांना संबलपूरला धाडले. त्यांना दोन दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी एका दिवसाच्या आत आपला अहवाल दिला. त्यानंतर १६ एप्रिलच्या घटनेवर तातडीने कारवाई करीत निवडणुक आयोगाने १७ एप्रिल रोजी मोहम्मद मोहिसन यांना निलंबित केले आहे. निवडणुक आयोगाकडे तक्रारीचा भडीमार होत असून त्यावर अनेक आठवडे निर्णय होत नाही. मात्र, या अधिकाऱ्याविरुद्ध मात्र त्यांना तातडीने निर्णय घेण्यासाठी वेळ मिळाला आहे.
विशेष म्हणजे, निवडणुक आयोगाच्या एका टीमने त्याच दिवशी ओडिशामध्येच एका रोड शो साठी राऊरकेलामध्ये आलेल्या बीजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरचीही झाडाझडती घेतली होती. पटनायक यांनी चौकशी करणाऱ्या टीमला पूर्ण सहकार्य केले. चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते हेलिकॉप्टरच्या आतच बसून होते.