ऑनलाइन सुनावणीदरम्यान अडथळा निर्माण झाल्यानंतर रात्र असताना देखील कोर्टात पोहचले जज, मेजरला लष्कराच्या कस्टडीमध्ये पाठवलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भुवनेश्वर (bhubaneswar )न्यायालयात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या सुनावणीदरम्यान हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी अटक झालेल्या मेजरला सैन्याच्या ताब्यात पाठविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार होती, परंतु ऑनलाइन सुनावणीत अडचण आल्यामुळे उपविभागीय न्यायदंडाधिकारी एस.के. मिश्रा रात्री दहाच्या सुमारास कोर्टात पोहोचले आणि या खटल्याची सुनावणी रात्री दिड वाजेपर्यंत चालली. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी अटक केलेल्या मेजरला तुरूंगाऐवजी सैन्य कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला.

दरम्यान, मेजरला हुंड्यासाठी पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास आणि हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी लष्कराच्या अधिकाऱ्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली आणि आयपीसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेजरवर पत्नीला मारहाण आणि तिला घरातून हुंडा आणला नाही तर गोळी मारून देईल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात पत्नीने आधीही मेजरची तक्रार केली होती, परंतु त्यावेळी परस्पर संमतीनंतर प्रकरण मिटविण्यात आले. यानंतरही मेजरच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही आणि त्याने पत्नीला सतत त्रास दिला. या संदर्भात पोलिसांनी यापूर्वी मेजरला नोटीस दिली होती, पण त्याने काही उत्तर दिले नाही. कारवाईनंतर पोलिसांनी गुरुवारी मेजरला अटक केली.