भूम तालुक्यातील शेतकर्‍याची सावकाराच्या जाचाळा कंटाळून आत्महत्या

भूम : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील मात्रेवाडी येथील हनुमंत त्रिंबक पवार वय ५५ वर्षे या शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या सततच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि २५ रोजी घडली. मात्रेवाडी शिवारातील गडगा येथे स्वतःच्याच शेतात दोरीच्या साहाय्याने लोखंडीच्या झाडास गळफास घेतला.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधीक माहिती अशी कि, हनुमंत पवार यांना मात्रेवाडी येथे २ एकर शेती होती. त्यासाठी त्यांनी २०१६ मध्ये गावातीलच खाजगी सावकार बालम वसुदेव खंडागळे यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये घेतले होते. या पैश्यापोटी त्या सावकाराने हनुमंत पवार यांच्याकडून २ एकर जमीन पत्नीच्या नावे खरेदीकरून घेतली. त्या पैश्याच्या पोटी आरोपी बालम खंडागळे हा मयतास सतत फोन करून पैश्याची मागणी करून त्रास देत होता. मंगळवार दि २५ रोजी पहाटे २ वाजून ३० ते ३ वाजण्याच्या सुमारास बालम खंडागळे हा मयत राहत असलेल्या ठिकाणी आला. त्यांनी शिवीगाळ करत मयत, त्याची पत्नी व मुलगा यांना झोपेतून उठवले व तात्काळ इथून निघून जा असे सांगितले. मयत राहत असेलेली जमीन खाजगी सावकारास पैश्याच्या मोबदल्यात लिहून दिली आहे.

मयतास त्याच्या मुलास मारहाण केली. तसेच घरातील संसारोपयोगी साहित्य घराबाहेर फेकून दिले. यावेळी मयताच्या मुलाने मयताचा भाऊ दिलीप पवार यांना फोन करून बोलावून घेतले. दिलीप पवार हे सोडवासोडव करत असताना गावातीलच रामदास तुळशीराम खंडागळे, हरिदास तुळशीराम खंडागळे, नाना बालम खंडागळे, आशाबाई बालम खंडागळे हे तेथे आले व मयताच्या कुटुंबास आमचे पैसे द्या नाहीतर तुम्हाला जीवे सोडणार नाही अशी धमकी दिली. दिलीप पवार यांनी भाऊ, भावजयी व पुतण्या यांना गावाकडे नेले. सकाळी झोपेतून उठून साधारण ६ वाजण्याच्या सुमारास मयत हे गाईचे दूध काढण्यासाठी शेतात गेले. मयताच्या मुलास त्याचे वडील शेताच्या बांधावरील लोखंडीच्या झाडास लटकलेल्या अवस्थेत दिसले.

या प्रकरणी मयताचा भाऊ दिलीप पवार यांच्या फिर्यादीवरून भूम पोलिसात बालम खंडागळे, अंकुश खंडागळे, नाना बालम खंडागळे, आशाबाई खंडागळे, हरिदास खंडागळे, रामदास खंडागळे या सहा जणांच्या विरोधात कलम ३०६, ३२३, ५०६, १४३, १४७, १४७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो. उप निरीक्षक राजेंद्र गडवे हे करत आहेत .

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like