धक्कादायक…! भूमाता ब्रिगेडचे अध्यक्षपद देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बऱ्याचदा मोठ्यामोठ्या नेत्यांशी माझी ओळख आहे असे सांगून त्याचा गैरफायदा अनेकजणांकडून घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता अहमदनगर मधील राहता येथे एक अशाच प्रकारची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भूमाता ब्रिगेडच्या राज्याचे अध्यक्षपद देण्याचे आमिष दाखवून चक्क एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना लोणी खुर्द येथे घडली. दत्तात्रय पोपटराव खेमनर (चांडेवाडी, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव असून आरोपी अद्याप मोकाटच आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित आरोपी तरुणीला तृप्ती देसाई यांच्याशी माझी चांगली ओळख आहे. मी तुला भूमाता ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्षपद देईन, असे आमिष दाखवत घरीच येत होता. पीडित तरुणी ज्या घरात भाड्याने राहायची त्या घराच्या घर मालकिणीने देखील आरोपीला तरुणीच्या घरी येण्यास मज्जाव केला होता. तरीदेखील आरोपी तरुणीच्या घरी येतच होता. तो तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करीत होता. मात्र तरुणी त्याला वारंवार नकार देत होती. म्हणूनच नोव्हेंबरमध्ये त्याने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला. त्यानंतरही अशाच प्रकारे बंदुकीचा धाक दाखवून कृत्य केले.

या घटनेबाबतची फिर्यात पीडित तरुणीने पोलिसात दिली आहे. तसेच आरोपी खेमनर याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. खेमनर स्वत:ला भूमाता ब्रिगेडचा जिल्हा समन्वयक समजतो. एका खासदाराचा सचिव असल्याची बतावणी तो करतो. एका पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असल्याचेही सांगतो. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.