छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा; हे आहेत नवीन मुख्यमंत्री

रायपूर : छत्तीसगड वृत्तसंस्था – १५ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून सत्तेत आलेल्या काँग्रेसने छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्यात आली आहे. मोठ्या प्रतिक्षे नंतर या नावाची घोषणा झाल्याने छत्तीसगडच्या लोकांची उत्सुकता आता संपली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते भूपेश बघेल हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. छत्तीसगडमध्ये हि स्पर्धकांच्या तीव्र संघर्षातून मुख्यमंत्री निवडले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मुख्यमंत्री निवडीसाठी चांगलाच कस पणाला लागल्याचे या निमित्ताने पाहण्यास मिळाले.
छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकी नंतर निकाल हाती आल्या नंतर हि सहा दिवस काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचे  नाव निश्चित करण्यात आघाडी घेता आली नाही. शेवटी आज राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित करून हा पेच सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.  भूपेश बघेल ,टी एस सिंहदेव,  चरणदास अनंत आणि  ताम्रध्वज साहू चौघांच्या नावांपैकी एक नाव घोषित करणे म्हणजे तस पाहायला गेले तर गटबाजीला आमंत्रण देण्या सारखेच होते तरीही हे काम लीलया पेलून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पदाची घोषणा केली आहे.  भूपेश बघेल हे राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्या नावाची घोषणा करून काँग्रेसने छत्तीसगडला एक उत्तम नेत्याची जोड दिली आहे असे म्हणता येते.
भूपेश बघेल हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांची ओळख शेतकऱ्याचा मुलगा अशी आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष होण्याने काँग्रेसला चांगले दिवस आले. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या छत्तीसकडे   भूपेश बघेल त्यांनी काँग्रेसची भक्कम बांधणी केली आणि काँग्रेसला चान्गले दिवस आणले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून ते विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत त्यांनी आपल्या रणनीतीची चुणूक दाखवली आणि भाजपच्या सत्तेचा वारू रोखून धरला. त्याच्या कष्टाचे चीज काँग्रेसने आज केले असून त्यांना मुख्यमंत्री पद दिल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये उत्सहाचे वातावरण आहे.
भूपेश बघेल यांचा अल्प परिचय 
–  तत्कालीन मध्य प्रदेशातील दुर्ग जिल्ह्यात  (आजचा छत्तीसगड ) २३ ऑगस्ट १९६१ रोजी भूपेश बघेल यांचा जन्म
–  काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात , १९९० ते ९४ च्या काळात  दुर्ग जिल्ह्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष
–  १९९३ ते २००१  मध्य प्रदेश गृहनिर्माण मंडळाचे निर्देशक म्हणून काम पहिले
–  २००० छत्तीसगड वेगळे झाले तेव्हा ते पाटण मतदारसंघातून निवडून आले आणि कॅबेनेट मंत्री झाले
–  २००३ साली सत्तेतून बाहेर पडल्यावर भूपेश बघेल यांना उपनेते पद देण्यात आले
–  २०१४ पासून छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत
–  १६ डिसेंबर २०१८ रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून निवड