दुर्दैवी ! भीषण अपघातात आजी, नात जागीच ठार !

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन – भाऊबीजेसाठी भुसावळहून इंदोरला रिक्षाने निघालेल्या पवार कुटुंबावर काळाने घाला घातला. शिरपूर जवळ रिक्षाला आयशर ट्रकने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात आजी आणि नातीचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. 17) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ऐन दिवाळीत पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने भुसावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रमिला पवार (60) व त्यांची नात कनिष्का पवार (01, दोघीही रा. भुसावळ) असे ठार झालेल्या आजी व नातीची नावे आहेत. तर नारायण पवार (65) व शितल नरेश पवार (24), वेदीका नरेश पवार (04 रा भुसावळ) जितेंद्र नाना देशमुख (47, रा. टीकळी ता. सेंदवा ) आदीसह रिक्षातील इतरही प्रवासी जखमी असून त्यांच्यावर शिरपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची माहिती अशी की, भुसावळ येथील स्वामी विहार परिसरात राहणारे नारायण पवार हे अ‍ॅपे रिक्षाने (एमपी -46 आर 0417 ) त्यांच्या मुलीकडे इंदोर येथे परिवारासह जात होते. तेव्हा मंगळवारी दुपारी शिरपूरपासून 17 किमी अंतरावर हाडाखेड गावाजवळ आयशर ट्रकने रिक्षाला मागून धडक दिल्याने रिक्षामधील मधील प्रमिला पवार व नात कनिष्का पवार यांचा मृत्यू झाला. तर नारायण पवार, शितल पवार, वेदीका पवार, जितेंद्र देशमुख आदीसह रिक्षातील इतर प्रवाशी जखमी झाले आहेत.