छत्रपती शिवाजी महाराजांवर येतेय मालिका, 8 वर्षांनंतर छोटया पडद्यावर परतणारा ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   ‘पिंजरा’ या मालिकेमुळे भूषण प्रधान याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आठ वर्षांनंतर भूषण छोट्या पडद्यावर परतत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, मालिका आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेली एक मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आपल्याला छत्रपतींच्या भूमिकेत दिसले होते. आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर छत्रपतींच्या आयुष्यावर मालिका येत असून या मालिकेत भुषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात भूषणने शिवाजी महाराजांवरील एक परफॉर्मन्स सादर केला होता. या परफॉर्मन्सनंतर त्याने या मालिकेविषयी सांगितले. भूषण सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने सोशल मीडियाच्या अकाऊंटद्वारे काही दिवसांपूर्वी त्याच्या या नव्या इनिंगबाबत सांगितले होते. भूषणने त्याच्या मालिकेचा उल्लेख केला नसला तरी मी आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमाकडे वळत असून मी त्यासाठी खूपच उत्सुक आहे असे त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते. आता त्याने इन्स्टास्टोरीत जय भवानी जय शिवाजी या मालिकेतील त्याचा फोटो पोस्ट केला आहे.

मराठीत मिळालेल्या यशानंतर भूषण आता बॉलिवूडकडे वळला आहे. तो सिमी जोसेफ यांच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री रायमा सेनसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास-२’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा विविध सिनेमांमध्ये भूषणने भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या.