टीम इंडियाच्या ‘या’ लोकप्रिय खेळाडूला पितृशोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या वडिलांचे आज (गुरुवार) निधन झाले. मेरठ येथील गंगासागर सी पॉकेट येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 63 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. किरनपाल सिंह हे पोलीस विभागात काम करत होते. आजारपणामुळे त्यांनी व्हीआरएस घेतली होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, भुवनेश्वर कुमारच्या वडिलांना यकृताचा आजार होता. मागिल काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. उपचाराला ते प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. मागील काही महिन्यापासून त्यांच्यावर घरातच उपचार सुरु होते. त्यांना दिल्ली एम्स व नोयडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर किमो थेरेपी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वाटत होते.

मात्र, दोन आठवड्यांपूर्वी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना गंगानगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर त्यांना मुजफ्फरनगर येथील मसूरीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातच यकृताच्या समस्येमुळे त्यांना कावीळ आणि अन्य आजार झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. आज त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.