पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Bibvewadi Pune Crime News | बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सनी जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. गुंड माधव वाघाटे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सलमान शेख याने ३ फेब्रुवारी रोजी पवन गवळी याच्यावर गोळीबार करुन जखमी केले होते. या प्रकरणात पोलिसांनी सनी जाधव, सलमान शेख सह ९ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
टोळीप्रमुख सनी शंकर जाधव (वय २६, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी), सलमान हमीद शेख (वय २५, रा. दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), हर्षल संतोष चव्हाण (वय १९, रा. पवळे चौक, कसबा पेठ), शक्ती गुरव (रा. लातूर) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत.
सनी जाधव याच्या टोळीवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे, लुट, दहशत माजविणे, अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
बिबवेवाडी परिसरात झालेल्या पवन गवळी याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे यांनी तपास करुन सनी जाधव, सलमान शेख, हर्षल चव्हाण या तिघांना अटक केली. शक्ती गुरव याचा शोध सुरु आहे.
टोळीप्रमुख सनी जाधव याने टोळीची दहशत व वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित टोळी तयार केली. लोकांमध्ये दहशत पसरुन स्वत:चे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना पाठविला. मनोज पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे अधिक तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, शशांक जाधव, पोलीस हवालदार प्रशांत धोत्रे, संतोष जाधव, पोलीस अंमलदार अनिल कर्चे, प्रतिक करंजे यांनी केली आहे.