रावण साम्राज्य टोळीतील सदस्याकडून पिस्तूल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरात विशेषतः देहूरोड परिसरात ऍक्टिव्ह असणाऱ्या रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगारास वाकड पोलिसांनी पिस्तुलासह अटक करण्यात आली. ही कारवाई आज (शनिवारी) दुपारी पाचच्या सुमारास कस्पटे वस्ती येथे केली.

विक्रांत सुभाष कांबळे (२०, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक हनुमांत बांगर यांना माहिती मिळाली की, एक तरुण कस्पटेवस्तीकडून हिंजवडीच्या दिशेने बुलेटवरून जात असून त्याच्याकडे पिस्तुल आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यातील तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने, बांगर आणि त्यांच्या पथकाने पोलिसांनी वाकड ब्रिजजवळ सापळा रचला. संशयित विक्रांत याला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी हा ऐवज जप्त करुन त्याला अटक केली.

विक्रांतची चौकशी केली असता तो देहूरोड परिसरातील रावण साम्राज्य टोळीतील सदस्य असल्याचे निदर्शनास आले. तपास वाकड पोलिस करत आहेत.