दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मंगेश दगडू गवळी, आकाश श्रावण चव्हाण (दोघे रा. हिंजवडी), आदिनाथ चंद्रकांत पांचाळ (रा. जळकोट, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीला जात आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस हद्दीत गस्त घालत आहेत. यादरम्यान बिबवेवाडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना या चोरट्याबाबत बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गवळी, चव्हाण, पांचाळ यांना पकडले. त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी बिबवेवाडी व पिंपरी परिसरातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश उसगावकर, शाम लोहोमकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.