सायकलच्या दुकानाच्या गोदामाला भीषण आग

पहाटेची घटना अजूनही आग सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारवाड्याजवळील जिजामाता बाग चौकात पहाटे सायकलच्या दुकानाच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याने तीन तासाच्या प्रयत्नांनंतरही अग्निशामक दलाच्या जवानांना आगीच्या ठिकाणी पोचणेही अवघड झाले आहे.

जिजामाता बाग येथील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सायकलच्या दुकानदाराने पार्किंगच्या जागेत बेसमेंटमध्ये सायकलचे गोदाम केले होते़ त्यात मोठ्या प्रमाणावर सायकली व इतर साहित्य ठेवले होते़ तसेच त्या ठिकाणी दुचाकीही पार्क करण्यात आल्या आहेत.

पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास या बेसमेंटमध्ये आग लागली व तिचा धूर वर राहणाऱ्या लोकांच्या घरात गेल्याने त्यांना आग लागल्याचे समजले. मध्य वस्ती असल्याने अग्निशामक दलाच्या ६ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. मात्र, बेसमेंटमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर धूर येत होता की, आग लागल्यानंतर दोन तासानंतरही जवानांना आगीच्या ठिकाणी पोहचणे अवघड होत होते.

आग आतल्या आत धुमसत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत आहे. फोमयुक्त पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण आणण्याचे काम जवान करीत आहेत. मात्र, तीन तासानंतरही आगीचा जोर कायम होता. त्यात बेसमेंटमधील सर्व सायकली, वाहने व इतर साहित्य जळून खाक झाली असण्याची शक्यता आहे.

You might also like