दुचाकी चोरणारे दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातून तीन दुचाकी चोरणाऱ्या दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका बुलेटसह आणखी दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जाकिर सलीम शेख (२५, दत्तवाडी पोलीस चौकीमागे), अतूल राजू अडागळे (२८, दत्तवाडी पोलीस चौकीमागे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन जण एका काळ्या रंहाच्या होंडा अक्टिवा दुचाकीसह विजयनगर कॉलनीत एलोरा लॉजजवळ संशयितपणे उभे आहेत. त्यानुसार पोलीस तेथे गेले. तेव्हा तेथे असलेल्या दोघांना पोलिसांनी हटकले. तेव्हा ते दुचाकी सुरु करून तेथून पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी दोघांना पकडले. त्यानंतर त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यावर त्यांनी त्यांच्याकडील दुचाकी शिंदे हायस्कूल जवळून चोरली असल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी एक बुलेट व डिलक्स दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, कर्मचारी रविंद्र फुलपगारे, तानाजी निकम, श्रीकांत शिरोळे, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, सोमेश्वर यादव, कुणाल माने, शरद राऊत, विकास कदम, सागर सुतकर, शिवाजी क्षीरसागर, राहूल ओलेकर, अमित सुर्वे, अक्षयकुमार वाबळे, अमोल लोहार यांच्या पथकाने केली.