जो बायडन यांनी सौदी अरेबिया, UAE ला दिला झटका, घेतला ‘हा’ धाडसी निर्णय

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातील अब्जावधी डॉलरच्या शस्त्र विक्री कराराला स्थिगिती देत सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठा झटका दिला आहे. ट्रम्पच्या कार्यकाळात झालेल्या शस्त्र विक्री करारांची समिक्षा केली जाणार असल्याचे अमेरिकन सरकारने म्हटले आहे. या करारानुसार अमेरिका युएईला एफ-35 फायटर जेटही देणार होते. शस्त्रविक्री कराराची समिक्षा होणे म्हणजे बायडन प्रशासन अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल करणार असल्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथोनी ब्लिंकेन म्हणाले की, ट्रम्प यांच्या कार्यकाळातील शस्त्र करार आमच्या परराष्ट्र धोरणाच्या सुसंगत आहेत का हे पाहिले जाणार आहे. यापूर्वी वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, बायडन प्रशासनाने सौदी अरेबियाला अंत्यत घातक शस्त्र आणि युएईला एफ-35 विमान देण्याच्या करारावर अल्पकालिन बंदी घातली आहे. हा निर्णय घेण्याच्या एक आठवडा आधीच सौदी अरेबियासोबतच्या संबंधाबाबत अमेरिका समिक्षा करणार असल्याचे बायडन यांनी म्हटले होते.

यापूर्वी इराणवर अधिक दबाव निर्माण करण्यासाठी ट्रम्प यांनी इस्रायल, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसोबतचे संबंध अधिक घट्ट केले होते. अमेरिकेने संयुक्त अरब अमिरातीसोबतच्या एक लाख 73 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक शस्त्र विक्रीला मंजुरी दिली होती. या करारानुसार, अमेरिका एफ-35 आणि एमक्यू-9 रिपर ड्रोन युएईला देणार आहे.