ट्रॅव्हल्स बसची पोलिसांच्या जीपला धडक ; सहाय्यक निरीक्षकासह ५ पोलिस जखमी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – नगर – औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल शिवारात वांबोरी फाटा येथे खासगी ट्रॅव्हल बसने दिलेल्या धडकेत पोलिसांच्या सरकारी वाहनातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एकूण पाच जण जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर बस जागेवर ठेवून चालक पळून गेला.

अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, सहायक फौजदार दिनकर घोरपडे, पोलीस हवालदार साबळे, पोलिस नाईक आंधळे, पोलिस कॉन्स्टेबल दीपक गांगर्डे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी जखमी झालेले सहाय्यक फौजदार घोरपडे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅव्हल बस नं MH27 P 3366 वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांची गस्तीवरील सरकारी जीपने वांबोरी फाटा येथे वळण घेण्याकरिता वळण्याचा इशारा देऊन टर्न घेतला. औरंगाबादकडून नगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पोलिसांच्या जीपला जोराची धडक दिली. या अपघातात दोन्हीही वाहनाचे नुकसान होऊन जीपमधील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सहारे हे करीत आहेत.

Loading...
You might also like