Pune News : ओतूरमध्ये भीषण अपघात ! दोघी ठार तर तिघे जखमी

ओतूर : पोलीसनामा ऑनलाईन – माती वाहतूक करणाऱ्या दोन डम्परच्या वेगाच्या शर्यतीत एका डम्परने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन बालकांसह त्यांचे वडील जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 31) सायंकाळच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर मढ गावच्या हद्दीत पारगाव फाटा येथे घडली. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी डम्पर चालकास अटक केली आहे. दरम्यान, या घटनेत अवघ्या चार आणि दोन वर्षीय बालकांच्या डोक्‍यावरून आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.

कविता अशोक जगताप (वय 28 रा. करंजाळे, ता. जुन्नर), प्राजक्‍त भरत माळी (वय 17 खुबी, ) असे मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत. तर अशोक गणेश जगताप, श्रेया (वय 2), आर्यन जगताप (वय 4 रा. करंजाळे, ता. जुन्नर) अशी जखमींची नावे आहेत. तर विजय अण्णा विटकर असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या डंपरचालकाचे नाव आहे. या प्रकरणी अशोक जगताप यांनी फिर्याद दिली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, नगरकडून कल्याणच्या दिशेने डम्पर (एमएच 17 एजी 4478) चालक विटकर भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळी आणखी एक डम्पर त्याच रस्त्याने निघाला होता. त्यावेळी दोघांमध्ये वेगाची शर्यतच सुरू होती. दरम्यान, अशोक जगताप दोन्ही मुलांसमवेत कविता, प्राजक्‍ता असे पाच जण दुचाकीने (एमएच 14 एफबी 3958)ने कल्याणच्या दिशेने निघाले होते. पारगाव फाटा येथे विटकर या डम्पर चालकाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पाचही जण खाली पडले त्यात कविता, प्राजक्‍ता यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही लहानमुलांसह अशोक जखमी झाले आहेत. तपास ओतूर पोलीस करीत आहेत.