आग्रा एक्सप्रेस हायवेवर मोठा अपघात बसची कारच्या धडकेत ६ जण ठार कारमधील बलुनही वाचवू शकले नाही प्राण

कानपूर : वृत्त संस्था – लखनौ -आग्रा एक्सप्रेसवेवर बसने दुभाजक तोडून समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर कारचा चेंदामेंदा झाला आहे. कारमधील बलूनही पाच जणांचा प्राण वाचवू शकले नाहीत. कानपूरच्या बिल्हौरजवळील मकनपूर परिसरात मंगळवारी पहाटे हा अपघात घडला. आग्रा -लखनौ एक्सप्रेसवेवर गेल्या २४ तासात दुसरा मोठा अपघात झाला आहे.

बिहार स्टेट ट्रान्सपोर्टची व्हॉल्वो बस आग्रा येथून ४० प्रवाशांना घेऊन बिहारमधील मुजफ्फरपूर येथे जात होती. त्याच वेळी लखनौहून दिल्लीकडे फॉर्च्युनर कार जात होती. बसचालकाला डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले व त्याने रस्त्याच्यामध्ये आलेल्या दुभाजकाला धडक दिली. मधले रेलिंग तोडून बस विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर आली. तिने समोरुन आलेल्या कारला जोरात धडक दिली. त्यात कारमधील पाच जण व बसचालक यांचा जागीच मृत्यु झाला. रेलिंग तोडून खालच्या रस्त्यावर बस पडली तरी ती तशीच उभी राहिल्याने मोठा अपघात टळला. बस उलटी झाली असती तर बसमधील प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका होता.

ही धडक इतकी जोरात होती की, फॉर्च्युनर कारमधील बलुन अपघातानंतर उघडूनही त्यातील पाच जणांचा मृत्यु रोखू शकले नाहीत. कारमधील सर्व जण दिल्लीत राहणारे होते. आग्रा एक्सप्रेस हायवेवर गेल्या २४ तासातील हा दुसरा मोठा अपघात होता़ उन्नाव येथे ट्रक आणि व्हॅन यांच्या धडक होऊन झाल्यानंतर व्हॅनला आग लागली होती़ त्यात ७ जणांचा मृत्यु झाला होता़ मारुती व्हॅनचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व ती विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये शिरली़ समोरुन येणाºया ट्रकला तिने धडक दिली होती.