मोठी दुर्घटना ! 5800 गायींना घेऊन जाणारे जहाज बुडाले, 43 पैकी 1 कर्मचारी बचावला

टोकिओ : वृत्तसंस्था –   5800 गायी घेऊन जाणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाली आहे. या जहाजावर असलेल्या 43 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 1 कर्मचारी बचावला आहे. ही दुर्घटना जपानच्या दक्षिणेकडे घडली असून जहाज बेपत्ता होण्याच्या आधी खराब हवामानाच्या संकटात अडकल्याचा संदेश पाठवण्यात आला होता. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशीरा जहाजावरील एका कर्मचाऱ्याला पाण्यातून वाचवण्यात आले आहे.

तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाचवण्यात आलेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती चांगली आहे. तो फिलिपिन्सचा रहिवाशी आहे. जहाजावरून संदेश आल्यानंतर जपानच्या तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर त्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी एक व्यक्ती लाईफ जॅकेट घालून गटांगळ्या खात असून तो आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे दिसले. ग्लफ लाईवस्टॉक 1 या जहाजाने बुधवारी पहाटेच्या सुमारास हा संदेश पाठवला होता. या जहाजाचे वजन जवळपास 11 हजार 947 टन होते. यामध्ये 5800 गायी होत्या. हे जहाज पूर्व चीन समुद्राच्या अमामी ओशिमाच्या तटाजवळून जात असल्याची माहिती तटरक्षक दलांनी दिली.

ज्यावेळी हे जहाज अमामी ओशिमाच्या तटाजवळून जात असताना, या भागात मेसक चक्रीवादळ सुरु होते. त्यामुळे या ठिकाणचे हवामान खराब झाले होते. या जहाजावरून केवळ एवढाच संदेश प्राप्त झाला होता. मात्र, जहाजामध्ये काय बिघाड झाला, याबाबत काहीही समजू शकले नाही. जहाजामध्ये 38 जण फिलिपाईन्स, दोन न्युझीलंड आणि एक ऑस्ट्रेलियाचा कर्मचारी प्रवास करत होते. इतरांना वाचवण्यासाठी जपानच्या नौदलाकडून शोध कार्य सुरु करण्यात आले आहे. यामध्ये पाच विमाने आणि पाणबुड्यांना सहभागी करण्यात आले आहे.