मोठी कारवाई…द्रुतगती महामार्ग, वाकड येथून नऊ पिस्टल, १३ काडतुसे जप्त

पिंपरी-चिंचवड : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाकड येथे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत उच्च शिक्षीत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन आणि त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेऊन दरोडा, खंडणी विरोधी पथकाने तब्बल नऊ पिस्टल आणि १३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व पिस्टल विक्रीसाठी आणली असल्याचे तपासात समोर आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

अमोल सूर्यभान लेंडवे (३०, रा. गधंर्वनगरी, भोसरी), तुषार राजाराम सोंडकर (२८, रा.भोर), सोमनाथ कैलास चव्हाण (३१, रा. रायगड), अक्षय उर्फ सागर अरुण टिळेकर (२२, रा. दौड, पुणे) आणि सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (२५, रा. हवेली, पुणे) या पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक तरुण पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दरोडा, खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी आशिष बोटके यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे, कर्मचारी अजय भोसले, अशोक दुधावणे, गणेश हजारे, महेश खांडे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके, विक्रात गायकवाड, नितीन लोखंडे, उमेश पुलगम, शरीफ मुलाणी, किरण खांडेकर, निशांत काळे, किरण काटकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, आशिष बनकर, प्रविण माने, सुधीर डोळस, नितीन खेसे यांच्या पथकाने द्रुतगती मार्गावर वाकड येथे सापळा रचला.

एक संशयीत आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आढळले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव अमोल लेंडवे असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला अटक करून अधिक चौकशी सुरू केली. त्यावेळी पिस्टल विक्री करणाऱ्या एजंटची माहिती मिळाली. त्यानुसार आणखी चार जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. या पाच जणांकडून नऊ पिस्टल आणि १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत. अटक केलेले सर्वजण उच्च शिक्षीत असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.