काय सांगता ! होय, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मिळतोय गांजा, मुंबईतील मोठया कारवाईत विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   कॉलेज तरूणांना ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई टर्नर रोडवर मरवा भवन कंपाऊंड जवळ करण्यात आली. दरम्यान, मुंबई गांजा विकणाऱ्या टोळीचं जाळं किती पसरलं आहे, याबाबत मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस तपास करत आहेत.

दोन जण उच्च प्रतीचा गांजा विक्री करण्यासाठी मुंबईत येणार असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीची शहानिशा करून आरोपींना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव गावडे व इतर सहकाऱ्यांनी टर्नर रोडवर मरवा भवन कंपाऊंड जवळ फुटपाथवर सापळा रचला.
त्यावेळी फुटपाथवरील स्ट्रीट लाईटजवळ दोन जण संशयास्पद हालचाल करताना आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 224 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतिचा गांजा आढळून आला. ऑनलाईन विक्रीच्या इराद्याने आणलेल्या गांजाची किंमत 5 लाख 37 हजार 600 रुपये आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कॉलेज तरुणांना ऑनलाईन गांजा विकणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस अधिकारी आरोपींची कसून चौकशी करत आहेत. मुंबईत गांजा विकरणाऱ्या टोळीचं जाळं किती पसरलं आहे, याबाबत पोलीस माहिती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.