बारामतीत पत्त्याच्या क्लबवर छापा तर 33 जणांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती तालुक्यातील माळेगाव येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईत 33 जणांना अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी राजरोसपणे सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून 33 जणांना अटक केली. आरोपींकडून 7 दुचाकीसह, एक कार, जुगाराचे साहित्य असा 9 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस अधिकारी शिरगावकर यांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी माळेगावच्या हद्दीतील रमाबाई नगर येथे बेकायदेशीर पत्त्यांच्या क्लबवर छापा टाकला. या कारवाईत क्लब चालवणाऱ्या रमण गायकवाड याच्यासह 33 जणांवर कारवाई केली. रमाबाई नगरमधील एका बंगल्यामध्ये विनापरवाना पैशांचा जुगार, पत्यांचा क्लब सुरु होता.

पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून रमण गायकवाडसह 33 जणांवर कारवाई करून सात दुचाकी वाहनासह, एक कार, टेबल, खुर्च्या, जुगाराचे साहित्य असे एकूण 9 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीचे अतिरीक्त अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पोलीस हवालदार सुरेश भोई, रमेश केकान, अप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लांडगे, दत्तात्रय गवळी यांच्या पथकाने केली.