पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासंदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठीची मुदत 20 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रमाणपत्र सादर करण्यास मुदवाढ मिळावी अशी विनंती अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार उदय सामंत यांनी ही घोषणा केली आहे
.
उदय सामंत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेश घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी EWS मूळ प्रमाणपत्र, NCL मूळ प्रमाणपत्र, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्यासाठी 20 जानेवारी पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ही मुदत वाढ अंतिम असून यानंतर कोणत्याही स्वरुपाची मुदत वाढवून दिली जाणार नाही, याची नोंद पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी.

पालक व विद्यार्थ्यांना इशारा

पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी 20 जानेवारी पर्यंत स्वत:च्या लॉगइनमधून पद्धतीने मूळ प्रमाणपत्र सादर करावी. जे उमेदवार मूळ प्रमाणपत्र 20 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करणार नाहीत, अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करुन त्यांना दुसऱ्या फेरीकरीता खुल्या वर्गातून पात्र ठरवण्यात येईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे.

फक्त याच विद्यार्थ्यांना मुदतवाढ

उदय सामंत यांनी असेही सांगितले की, ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरीता अर्ज केल्याची पावती ऑनलाइन अर्ज करताना सादर केली आहे, अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुढील सुधारीत वेळापत्रक सोमवारनंतर (दि.18) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.