केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली 100 लाख कोटींच्या ‘या’ योजनेची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन या योजनेची घोषणा केली आहे. या प्रोजेक्टला जवळपास १०० लाख कोटींपेक्षा जास्त खर्च येण्याचा अंदाज आहे. निर्मला सीतारामन यांनी नॅशनल इन्फ्रा पाइपलाइनच्या संबंधित उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याची मनीषा आहे. त्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांच्या या योजनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इन्फ्रा पाइपलाइन तयार करण्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती केली जाणार असून एनआयपी योजनेच्या नियोजन, माहिती प्रसार आणि देखरेखीच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्ये आणि खासगी क्षेत्र हे तिन्ही मिळून एकत्रित काम करणार आहेत. तसेच जवळपास ७० भागीदारांशी सल्लामसलत करून चार महिन्याच्या कमी कालावधीत ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे निर्मला सीताराम यांनी स्पष्ट केले.

मागील ६ वर्षांत जवळपास इन्फ्रास्ट्रक्चरवर ५१ लाख कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचे योगदान आहे. एनआयपी (NIP) अंतर्गत १४ लाख कोटी रुपये रेल्वे प्रोजेक्टसाठी तर २० लाख कोटी रुपये रस्ते आणि २५ लाख कोटी रुपये एनर्जी प्रोजेक्टवर खर्च प्रस्तावित असणार आहे. यात खाजगी क्षेत्राची देखील गुंतवणूक असणार आहे. ही खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक जवळपास २०-२५ टक्के असणार आहे. इतर गुंतवणूक एनआयपी, केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात येणार आहे.

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (DPIIT)नं केंद्र आणि राज्य सरकारांच्या मदतीनं सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम (single-window clearance system) बनवण्याची योजना तयार केली आहे. ही प्रस्तावित सिंगल विंडो सिस्टीम एकूण चार टप्प्यांत स्थापित करण्यात येणार असल्याचे समजते.

तसेच या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीसाठी सिंगल ऑनलाइन फॉर्म असणार आहे. ही योजना एकूण २१ राज्यांमध्ये स्थापित केली जाणार असून यासाठी प्रत्येक मंत्रालय आणि राज्याचा विचार केल्यास दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/