बांग्लादेशात मशिदीत भीषण स्फोट, 14 जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीर

ढाका : वृत्तसंस्था – बांग्लादेशमधील नारायणगंज हे शहर भीषण स्फोटाने हादरुन गेलं आहे. या ठिकाणी एका मशिदीत स्फोट झाला. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला असून 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना ढाका मेडीकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नारायणगंज मधल्या मशिदीत एकाचवेळी 7 एसी मशिनमध्ये हे स्फोट झाले अशी माहिती पोलीसंनी दिली.

या स्फोटामध्ये एकूण 37 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या स्फोटामागे घातपात आहे की अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रथमदर्शनी असं काहीही नसल्याचं पोलिसांनी सांगितले. काही तांत्रिक बिघाडामुळे एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये हे स्फोट झाले असावेत असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यानंतर फायर ब्रिगेड आणि सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून मदत कार्याला सुरुवात केली.

सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने मशिदीतून लोकांना बाहेर काढण्यात आलं. तर जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले असून पोलीसांकडून घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत. पंतप्रधान शेख हसिना यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली असून मदतीचे आश्वासनही दिलं आहे.