GJ : भाजपाला मोठा धक्का, एका बडया नेत्याचा पक्षाला रामराम

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्येच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भाजपामधील जेष्ठ नेते खासदार मनसुख वसावा (Senior BJP leader MP Mansukh Vasava) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचे वसावा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

 

 

 

 

वसावा यांचा आदिवासी समुदायामध्ये मोठा जनाधार आहे. भरुच लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार असलेल्या मनसुखभाई धनजीभाई वसावा यांनी 28 डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याची माहिती दिली. या पत्रात मनसुख वसावा यांनी लिहिले की, मी पक्षासोबत निष्ठेने राहिलो आहे. तसे पक्ष आणि जीवनातील सिद्धांताचे पालन करण्यामध्ये खबरदारी बाळगली आहे. मात्र शेवटी मी एक माणूस आहे आणि माणसाकडून चूक होते. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. तसेच संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे.

मनसुख वसावा हे हल्लीच्या काही विधानांमुळे चर्चेत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना पत्र लिहून वसावा यांनी सांगितले की, गुजरातमध्ये आदिवासी महिलांची तस्करी होत आहे. याशिवाय स्टॅच्यु ऑफ युनिटीसंदर्भात वसावा यांनी पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिले होते. मोदींना लिहिलेल्या पत्रामधून त्यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या आसपासच्या परिसरातील इको सेंसेटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने गुजरातमधील 26 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या.