मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का ! सिंधीयांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा ‘धमाका’

भोपाळ : वृत्तसंस्था –    माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी काँग्रेसमधूम भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची तयारी करत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या सतीश सिकरवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. ग्वाल्हेर-चंबळमध्ये हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

सतीश सिकरवार गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मुन्नालाल यादव यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. पंरतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ज्योतिरादित्य सिंधीया आणि त्याच्या समर्थकांनी पक्षात प्रवेश केल्यानं ते नाराज होते. सिकरवार ग्वाल्हेरमधील मोठे नेते आहेत. भाजपमधील अनेक नेते हे सिंधिया आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या प्रवेशामुळं नाराज आहेत. यातील अनेक असंतुष्ट नेते हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

सतीश सिकरवार यांची कौटुंबिक पार्श्वभूमी भाजपशी संबंधित आहे. त्यांचे वडिल गजराज सिंह आणि भाऊ सत्यपाल सिंह भाजपचे आमदार होते. सिंधीया यांच्या भाजप प्रवेशामुळं ते नाराज होते.

लवकरच मध्य प्रदेशात पोटनिवडणूक होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यातील काँग्रेस सरकार कोसळलं आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील सरकारचं भवितव्य आता या निवडणुकीवर अवलंबून असणार आहे. यामुळं आता भाजपमधील नाराज नेत्यांवर काँग्रेसनं लक्ष केंद्रीत केलं आहे.