Pune News : पुण्यातील एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाहीः ‘त्या’ अफवांचं खा. गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून खंडन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे 19 नगरसेवक पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असून यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामिल होणार असल्याच्या शक्यतेने त्यांच्या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. महापालिकेत भाजपकडे 98 नगरसेवकांचे संख्याबळ असून, सर्वांनाच पदे देणे शक्य नसल्याने नाराजांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी तयारी सुरु केली आहे.

मागील महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवत राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेतली. या निवडणूकीत 99 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेतून अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता अनेक नेते महाविकास आघाडीत प्रवेश करत आहेत.भाजपचे 19 नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या चर्चांना अफवा असल्याचे सांगत या वृत्ताचे खंडन केले आहे. भाजपाचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, त्यामुळे सध्या सुरु असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. कुणीतरी मुद्दाम अशा प्रकारच्या बातम्या पसरवत आहे, ज्यामध्ये कही निष्पन्न होणार नसल्याचे बापट आणि मुळीक यांनी म्हटले आहे. असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

मागील महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वत्र भाजपचे वारे होते. त्यामुळे पुण्यात भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले. सत्ता मिळवण्यासाठी नव्या तसेच अन्य पक्षांतील आयारामांना संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक जण लाटेत निवडून आले. गेल्या चार वर्षात बहुतांश नगरसेवकांकडून प्रमुख पदे मिळवण्याची चढाओढ होती. मात्र, मानाच्या समजल्या जाणाऱ्या पदांवर केवळ बारा जणांना संधी मिळाली. त्यामुळे मुळचे भाजपमधील आणि नव्याने दाखल झालेल्या नगरसेवकांमध्ये सुप्त संघर्ष उफाळला आहे. त्याचे पडसाद पालिकेच्या कामकाजात आणि संघटनेत उमटू लागले असून, आगामी निवडणुकीत पक्षातील बंडखोरी रोखणे भाजप समोरील मोठे आव्हान असणार आहे.