ममता बॅनर्जींना मोठा धक्का ! परिवहनमंत्री शुभेंद्र अधिकारी यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

कोलकाता : वृत्तसंस्था – ममता सरकारमधील परिवहनमंत्री शुभेंद्र अधिकारी यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा बंगालच्या राजकारणात सुरू होत्या. त्याचप्रमाणे ते गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना अनुपस्थित राहत होते. दरम्यान, अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक ठेपल्या असताना पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसत आहे.

ममता बॅनर्जी सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे शुभेंद्र अधिकारी यांचे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठे वजन होते. आपल्या संघटनात्मक कौशल्यामुळे शुभेंद्र अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व म्हणून समोर आले होते. दोन वेळा खासदार राहिलेले शुभेंद्र हे नंदिग्राममधील आंदोलनामुळे चर्चेत आले होते. या आंदोलनाने बंगालच्या राजकारणाची दिशा बदलली होती. मात्र, काही दिवसांपासून ते भाजपच्या गोट्यात दाखल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

तथापि, गुरुवारी रिव्हर ब्रिज कमिशनमधून शुभेंद्र अधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा त्यांनी दिला आहे. आपल्या राजीनामापत्रात ते म्हणाले, मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. याबद्दल राज्यपालांना माहिती दिली असून, तुम्ही मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे आमदार मिहीर गोस्वामी हे आज भाजपचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पश्चिम बंगालमध्ये चांगला अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आगामी काळात मोठ्या प्रमाणात पक्षात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.