गडकरी, फडणवीस यांना जोरदार धक्का ! नागपुरात भाजपचा गड ढासळला, कॉंग्रेसचे वंजारी विजयी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पर्यायाने भाजपचे वर्चस्व असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. वंजारी यांना 61 हजार 701 मते मिळाली आहेत, तर भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले आहे. जोशी यांचा 18 हजार 710 मतांनी पराभव झाला आहे.

नागपूर हा भाजपचा गड आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपच्या जोशी यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

पुणे पदवीधर मतदारसंघातही यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली. नेहमी भाजपला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. मतदारसंघात पहिल्याच पसंती क्रमांकाची तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन महाविकास आघाडीचे अरुण गणपती लाड विजयी झाले आहेत.

अमरावतीत भाजपवर नामुष्की
अमरावतीमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. यामध्ये भाजपचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेल्याने बाद ठरविण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच शिवसेनेला डिवचताना ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही, आमचा एकतरी आला, असा टोला हाणला होता. तो याच अमरावतीच्या जागेवरून होता. मात्र, आता भाजपचा उमेदवार शर्यतीतून बाद झाल्याने खळबळ उडाली आहे.