काँग्रेसला सर्वात मोठा झटका ! ज्योतिरादित्य शिंदेंनी ठोकला काँग्रेसला ‘रामराम’, दिला राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. आजच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आजच माधवराव शिंदे यांची जयंती आहे. या निमित्तानं ते एक मोठं पाऊल टाकू शकतात. सध्या तरी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कालपासूनच याबाबत हालचाली होताना दिसल्या. ज्योतिरादित्य शिंदे यांना मानणारा आमदारांचा मोठा गट सध्या बंगळुरूत आहे. त्यांची संख्या 17-18 च्या आसपास आहे. हा पूर्ण गट भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात आजच (मंगळवार दि 10 मार्च 2020) तासभर चर्चा झाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत हे स्पष्ट दिसत होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल, नंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल अशी डिल झाल्याची माहिती आहे. इतकेच नाही तर त्यांच्या मदतीनं मध्य प्रदेशता शिवराज सिंह चौहान यांचं भाजपमधील सरकार पुन्हा स्थापित होणार.

गेल्या दीड वर्षांपासून त्यांना राज्याच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं वागणूक मिळत होती त्यात ज्योतिरादित्य शिंदेंना मोकळ श्वास घेता येत नव्हता. अनेकदा त्यांनी आपली नाराजी उघड करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर बायोमधून काँग्रेस हा शब्दही हटवला होता. क्रिकेटप्रेमी शब्द ठेवला होता. या सगळ्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल खात्री झाली होती.