‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास हाय कोर्टाचा ‘नकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेची जामीनासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे आज (गुरुवार दि. १८ जुलै) सुनावणी झाली. सात वर्षांपूर्वीच्या एका खंडणी प्रकरणात सातारा सत्र न्यायालयाने बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बिचुकलेने १ जुलैला उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी झाली. याशिवाय सातारा सत्र न्यायालयात हा खंडणीच्या गुन्ह्याखाली दाखल खटला लवकरात लवकर संपवावा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

सातारा पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी २१ जून रोजी मुंबईत मराठी बिग बॉसच्या घरातून अटक केली होती. त्याला कलम ३८४ आणि ५०६ अंतर्गत खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली. आजही बिचुकले या प्रकरणी अटकेतच आहे. हाय कोर्टाने ही याचिका पहिल्याच सुनावणीत निकाली काढली आहे. सध्या हा खटला अंतिम टप्प्यात आहे, शिवाय बिचुकलेविरोधात कोणताही सबळ पुरावा नाही. त्यामुळे हा खटला लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हाय कोर्टात दिली.

पोलिसांचे म्हणणे होते की, आरोपी बिचुकले फरारी होता. पंरतु बिचुकले इतकी वर्षे सातारा शहरातच होता, त्यामुळे पोलिसांचे म्हणणे चुकीचे आहे असा युक्तिवाद बचाव पक्षाने सत्र न्यायालयात केला होता. बिचुकलेने यंदा लोकसभा निवडणूक लढवली होती. या काळात त्याला पोलिस संरक्षणही देण्यात आले होते.

Loading...
You might also like