भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट, 20 चिनी सैनिक जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १५ जूनला चीनच्या सैनिकांनी गलवान घाटीमध्ये पहिला हल्ला केला होता. खिळे चिकटविलेले लोखंडी रॉड, अणुकुचीदार जाळी आदींनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. भारतीय जवानांनी लगेचच सावध होत चीनच्या सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले होते. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर ४० हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. देशातील असंतोष रोखण्यासाठी चीनने अद्याप हे मान्य केलेले नाही. अजूनही लडाखच्या सीमेवर भारत-चीन दरम्यान तणावाचे वातावरण आहे. पुन्हा एकदा भारत चीन सैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान पुन्हा तणाव वाढला आहे. या झटापटीत भारताचे ४ आणि चीनचे २० जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

तीन दिवसांपूर्वी सिक्किमच्या के ना कुला पासवर ही झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या सैनिकांनी एलएसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चीनच्या बाजुने मोठ्या प्रमाणावर चिनी सैनिक येत होते. त्यांना भारतीय जवानांनी रोखले असता ही झटापट झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच हा तणाव कमी करण्यासाठी काल भारत-चीन दरम्यान सुमारे १५ तास बैठक सुरु होती. लडाखच्या मोल्डोमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये दोन महिन्यांनंतर अचानक ९ व्या फेरीतील बैठक झाली. या बैठकीतील निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. मात्र, एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठीच ही बैठक झाल्याचे समजते. भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आज तक, टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पुन्हा भारतीय क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न झाल्याने एलएसीवर तणाव वाढला आहे. एकीकडे चीनने लडाखमधून १०००० सैनिकांना हटविल्याचे वृत्त पसरविले आणि दुसरीकडे सिक्किममध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारच्या सुत्रांनुसार चीनने तैनाती कमी केली आहे. मात्र, तरीही भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत.