#BIG Breaking : एअर इंडीयाचे विमान हायजॅक करण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअर इंडीयाच्या कार्यालयात फोन करत अज्ञाताने एअर इंडीयाचे विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विमातळांवरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.

एअर इंडीयाच्या कॉलसेंटरमध्ये फोन करून तुमचे विमान हायजॅक करून ते पाकिस्तानात नेऊ अशी धमकी देण्यात आली.  त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर याची माहिती गुप्तचर यंत्रणांना देण्यात आली आहे. तर देशातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच विमातळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच पार्किंगमध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी कऱण्यात येत आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशात मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता यंत्रणांकडून व्यक्त कऱण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. फोन आल्यानंतर ब्युरो ऑफ सिवील एविएशन सिक्यूरिटी (BCAS) कडून सर्व विमानतळांना खबरदरीचा इशारा देण्यात आला असून टर्मिनल आणि ऑपरेशन क्षेत्रात जाण्यापुर्वी कसून तपासणी करण्याचे तसेच कर्मचारी, प्रवासी, कॅटरिंग यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा फोन खोडसाळ असू शकतो परंतु त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी रायगड जिल्ह्यात बसमध्ये तर लखनऊ येथे एका रेल्वेत आईडी सापडले होते. त्यामुळे देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. तर लखनऊमध्ये रेल्वेत सापडलेल्या एका चिठ्ठीत पंतप्रधानांच्या एका सभेत मोठा घातपात घडविण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता विमान हायजॅक करण्याची धमकी देणारा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली असून गुप्तचर यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे.