राज्याच्या महासंचालकांच्या हाती दिल्लीची सूत्र ? राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडे दिल्लीची सुत्रे येण्याची शक्यता आहे. जयस्वाल यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हा निर्णय गृहमंत्री अमित शहा घेणार आहेत. जयस्वाल यांनी केंद्रीय गुप्तचर संस्था असलेल्या आयबी आणि रॉ मध्ये दहा वर्षापेक्षा जास्त वेळ काम केले आहे. त्यांचा अनुभव आणि ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांच्याकडे दिल्लीचे आयुक्तपद देण्याची शक्यता आहे. येत्या एक ते दोन दिवसांत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य पोलिस दलात देखील मोठया प्रमाणावर बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासुन अनेक ठिकाणच्या आयुक्तालयात मोठया प्रमाणावर फेरबदल होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाणे, पुणे, नागपूर आणि इतर काही ठिकाणच्या आयुक्तालयात तसेच अनेक जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदल्या होणार आहेत. आत्तापासुनच कोण आयुक्त म्हणून येणार तर कोण कुठं जाणार याबाबत वेगवेगळे तर्क-विर्तक काढण्यास सुरवात झाली आहे. दि. 31 जानेवारीला दिल्लीचे पोलिस आयुक्त जरी निवृत्त होत असले तरी त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. जर महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक दिल्लीत गेले तर त्यांच्या पदावर कोणाची नेमणुक होणार याबाबत देखील चर्चा आहे. एवढेच नव्हे तर बदल्यांचा पहिला लॉट हा आगामी काही दिवसांत निघणार असल्याची माहिती गृह विभागातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे नाव गृहमंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुका होत असून आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे. दिल्लीचे सध्याचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक हे येत्या 31 जानेवारीला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती केली पाहिजे याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. त्याचे पालन करून नवी नियुक्ती केली जाते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करत ही नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार विविध राज्यातील तीन ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उमेदवार म्हणून निवड केली जाते आणि त्यामधून एकाची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होते. तसेच या अधिकाऱ्यांची कारकिर्द ही उत्तम आणि स्वच्छ असावी असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

कोण आहेत जयस्वाल ?

जयस्वाल हे यापूर्वी पोलीस आयुक्त होते. सध्या ते राज्याचे महासंचालक आहेत. त्यांनी केंद्रात आणि रॉमध्ये काम केले आहे. त्यांना केंद्रातील सचिवपदावर काम करण्याचा अनुभव आहे. 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटच्या तपास पथकात ते सहभागी झाले होते. मुंबई पोलीस खात्यात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले होते. जयस्वाल यांनी रॉ आणि आयबी या गुप्तचर संस्थेत दहा वर्षे महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.