केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! दिल्लीत पुन्हा Lockdown मध्ये वाढ, 31 मेपर्यंत निर्बंध कायम

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना परिस्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याचे सांगत केजरीवाल सरकारने दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये 1 आठवड्यांची वाढ केली आहे. आतापर्यंत दिल्लीत लॉकडाऊनमध्ये पाचव्यांदा वाढ केली आहे. सध्याचे निर्बंध आता 31 मेपर्यंत कायम राहणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 31 मे सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केल्याचे रविवारी (दि. 23) जाहीर केले आहे. दिल्लीत 19 एप्रिलपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे.

लॉकडाऊनदरम्यान मेट्रो सेवा देखील बंद राहणार आहे. याआधीचेच नियम कायम राहणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. केजरीवाल यांनी यावेळी दिल्लीच्या नागरिकांची मत जाऊन घेतल्याचे सांगितले. कोरोना परिस्थितीचा आढावा घेता राज्यात आणखी 7 दिवसांचा लॉकडाऊन करावा अशी मागणी नागरिक करत होते, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन उठवण्याची घाई केली तर गेल्या महिन्याभराच्या मेहनतीवर पाणी फेरल जाईल. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे आणि अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर 31 मेनंतर निर्बंधांमध्ये सूट देण्याचा विचार सरकार नक्कीच करेल, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे. दरम्यान दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हीटी रेट 36 टक्क्यांवर होता तो आता 2.5 टक्यांवर आला आहे.