पुण्यात आता ‘कोरोना’ चाचण्यांचा वेग वाढणार, महानगरपालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना ग्रस्त रुग्णांची नोंद योग्य वेळेत करण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर पुणे मनपाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता पुण्यातील चाचण्यांचा वेग वाढणार आहे.

माझं कुटुंब माझी जबाबदारी या योजनेनुसार नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. सदयस्थितीत आरटीपीसीआर चाचण्या करण्याची मर्यादित क्षमता असल्याने आणि त्यासाठी एनआयव्ही, ससून, आयशर या संस्थावर पुणे महापालिका अवलंबून आहे. त्यामुळे महापालिकाच नव्या मशीन घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे रोज चारशे ते पाचशे चाचण्या जास्त होऊ शकतील अशी माहिती पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिका आता नव्या उपाय योजनांवर भर देणार आहे.मुंबई प्रमाणेच नागरिकांसाठी आता आचारंहिता लागू करण्यात येणार आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोरोनाचा प्रसार वेगात होत असल्याने महापालिका नवे नियम करणार आहे. जे या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंडही करण्यात येणार आहे. या नियमांमध्ये दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही. आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही.