तिरूपती बालाजी मंदिर समितीचा भक्तांसाठी ‘मोठा’ निर्णय

तिरुमला : वृत्तसंस्था – देशातील आणि परदेशातील कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरूपती बालाजी समितीनं भक्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भक्तांना आनंद देणार असून समितीने बालाजी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आजपासून मोफत लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे. तिरूमला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. तर सण आणि शुभदिवसाच्या मुर्हुतावर लाखो भाविक बालाजीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

मंदिर समितीकडून सद्यस्थितीला एका दिवसात वीस हजार लाडूंचा प्रसाद देण्यात येतो. त्यामध्ये पायी येणाऱ्या भक्तांसाठी 172 ग्रॅमचा लाडू तर इतर भक्तांसाठी 40 ग्रॅमचा लाडू देण्यात येत होता. मात्र, आता नवीन नियमानुसार 175 ग्रॅमचे लाडू 80 हजार भक्तांना प्रसाद म्हणून मोफत देण्यात येणार आहेत. मात्र, जर, एखाद्या भक्ताने अतिरिक्त लाडूची मागणी केली, तर त्याला एका लाडूसाठी 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार असल्याचे समिती व्यवस्थापनाने सांगितले. मोफत लाडू देण्याची घोषणा 31 डिसेंबर रोजी करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी आज पासून करण्यात आली आहे.

यापूर्वी फक्त पायी येणाऱ्या भक्तांनाच मोफत लाडू देण्यात येत होता. मात्र, आता सर्वच भक्तांना प्रसादाचा लाडू मोफत देण्यात येणार आहे. एका आकडेवारीनुसार दररोज 60 ते 70 हजार भाविक भक्त तिरूपतीच्या दर्शनाला येतात. तर सुट्टीच्या दिवशी ही संख्या अधिक वाढते. त्यामुळे, मंदिर समितीने प्रसादाचे लाडू वाढविण्याचा आणि मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –