‘ऑपरेशन लोटस’; कर्नाटकमध्ये सत्तेसाठी पुन्हा होणार महानाट्य 

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसची सत्ता मोठ्या महानाट्यानंतर उभारण्यात आली. हीच सत्ता आता उलटून टाकण्यासाठी भाजप नवी खेळी करत असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी १७ जानेवारी ही तारीख निश्चित केल्याचं समजत आहे.

https://twitter.com/ANI/status/1084707712351588352

भाजप काँग्रेस-जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप ‘ऑपरेशन लोटस’ वर काम करत आहे. असा आरोप काँग्रेसचे डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. सत्ता उलथवण्यासाठी आमच्या तीन आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना पैशांचं आमिष दिलं जात आहे. त्या ठिकाणी भाजपाचेही काही आमदार आहेत.

काँग्रेस आमदारांना किती रुपयांची ऑफर दिली जात आहे. याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यासोबतच आमचे मुख्यमंत्री भाजपच्या बाबतीत जरा जास्तच उदार आहेत, असं सांगत शिवकुमार यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावरही निशाणा साधला. सर्व आमदारांनी त्यांना भाजपाच्या कटकारस्थानाची कल्पना देऊनही मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही, असं शिवकुमार यांनी म्हटलं.

कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस-जेडीएसचे एकूण 116 आमदार आहेत. दोन अपक्ष आणि एक बहुजन समाज पार्टीचे आमदारांचे पाठबळ काँग्रेस- जेडीएसला आहे. अशी एकूण संस्था 119 आहे. तर भाजपचे एकून 104 आमदार आहेत. मात्र अपक्ष आमदार आर. शंकर आणि बहुजन समाज पार्टीच्या एन. महेश यांची कॅबिनेटमधून गच्छंती करण्यात आल्यानं त्यांचे सत्ताधाऱ्यांसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे या आमदारांचे राजीनामे भाजपसाठी दुधात साखर ठरू शकतात.

विधानसभेतील आमदारांची संख्या 207 वर आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. असं झालंच तर सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 104 होईल. परंतू काँग्रेस-जेडीएस यांच्या सत्ततेत असणाऱ्या 16 आमदारांनी राजीनामे देणंही भाजपला सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आहे.

दरम्यान, शिवकुमार यांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी पलटवार केला आहे. काँग्रेसला स्वतःचे आमदार सांभळता येत नाहीत. म्हणून ते आमच्यावर आरोप करत आहेत, अस सदानंद गौडा यांनी म्हटलं आहे.